Sunday, January 24, 2010
JUST DO IT!
CNG - Clean ‘N’ Green! तसा नवाच ग्रुप. कोणी सुरु केला? कोणती NGO मदत करते?, काय कामं करतात? कुठे करतात? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात येतील. तर मुळात सुरुवात कशी झाली हा मुद्दा. शिवाजीपार्क मध्ये रोज येत असलेल्या एकाच्या डोक्यातली हि झकास कल्पना. आपण रोज इथे असतो. कधीकधी तर घरात कमी आणि पार्कातच जास्त पडिक असतो. अर्थात दादर – माहिम भागातल्या प्रत्येक तरुणाचं असच असतं. पार्कचा कट्टा हि हक्काची जागा असते. पण तेच पार्क कचर्याने भरलं असताना लोकांना चैन कसं पडतं? ह्यासाठी काहितरी आपणच सुरु केलं पाहिजे असं ठरवुन दादरमधील “मुकुल साठेनं” हा ग्रुप, नपेक्षा “प्रोजेक्ट” सुरु केलाय. मला हि कल्पना आवडली आणि मी व अजुन काहिजण मुकुलला ह्यात मदत करत आहोत. कुठलीहि NGO ह्यात आम्हाला मदत करत नाहिये, किंवा तशी अपेक्षाहि नाहि. आम्हाला इथे हवे फक्त न लाजता काम करणारे जास्तीत जास्त हात. व ह्याची जाणीव असलेले सुजाण नागरीक.
मुकुल सांगतो – “हा विचार अनेक दिवस डोक्यात होता, पण आपण हे कोणाला सांगितलं तर ते वेड्यात काढतील असं वाटायचं! पण एके दिवशी माझ्या ग्रुपसमोर मी हि कल्पना मांडली आणि सगळ्यांना पसंतहि पडली!” मुकुल आणि त्याच्या ग्रुपने एका रविवारी संपूर्ण पार्क भोवती एक चक्कर मारली. कुठे कुठे कचरा पडलाय? कुठे प्लास्टिक जास्त आहे? कचराकुंड्या कुठे आहेत? ह्या सगळ्याचा विचार केला आणि १ नोव्हेंबरला त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली देखिल. काम आणि एरिया वाढत गेला तशी कचर्याच्या पिशव्यांची संख्या वाढत गेली. पहिल्याच रविवारी पार्कातल्या एका कोपर्यातुन १२ पिशव्या प्लास्टिक निघाले यात होती मुख्यता गुटख्याची पाकिटे. खालोखाल होते चहा – कॉफिचे प्लास्टिक ग्लास, मग वेफर्स ची पाकिटे, चॉकलेट रॅपर्स वगैरे वगैरे. ८ तारखेच्या रविवारी आम्ही १४ पिशव्या प्लॅटिक जमा करुन ते कचर्यात टाकले. कालच्या रविवारी पार्कात कुठल्यातरी सत्संगाच्या निमित्ताने गर्दि असल्याने फक्त ७ पिशव्याच झाल्या पण हेहि नसे थोडके.
कालचा महत्वाचा मुद्दा – एका जॉगिंग करणार्या व्यक्तीने स्वत: थांबुन आजुबाजुला पडलेल्या चार सहा प्लॅस्टिकच्या पिशव्या पटापटा गोळा करुन आमच्या पिशवीत टाकल्या आणि परत जॉगिंगला निघुनहि गेला. हे असं झालं कि थोडं समाधान वाटतं, कदाचित आमच्यासारखाच पार्कावर मनापासून प्रेम करणारा कोणीतरी होता, नाव माहित नाहि, चेहराहि लक्षात न रहावा इतक्या पटकन आला थोडि का होईना मदत केली नी गेला. लोकांपर्यंत CNG चे काम पोहोचायला सुरुवात झालीये हे आमच्या दृष्टिने महत्वाचं आहे. तेव्हा मुकुलला मी म्हणालो – “मुकुल यात ह्याने जितकी मदत केली तितकी मदत समोर सत्संगाला आलेल्या गर्दितल्या प्रत्येकाने केली तरी तासाभरात सगळे पार्क चकाचक होईल!” आणि शब्दश: ते शक्यहि होते. शाळेत शिकवतात कि स्वच्छता हे देवाचे रुप आहे वगैरे, पण सत्संग करुन देव मिळवणारेच तिथे कचरा टाकुन जातात तेव्हा त्यांची किव येते. त्यांना आणि इतरांना सांगावसं वाटतं कि “बाबांनो मद्त केली नाहित तरी चालेल निदान कामं वाढवु नका!” अनेक लोकं आम्हांला थांबवुन हे काय करताय? का करताय? ह्याची माहिती घेतात. त्या लोकांना सुध्दा “कामं वाढवु नका!” हे गोड शब्दात सांगतो.
तसा तर हा विषय फार मोठा आहे. ह्याचा एक धागा थेट ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत जोडताहि येईल. पण फारसे प्रवचन न देता काहि गोष्टि नमुद कराव्याश्या वाटतात. आपण आपल्या पुरती वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता बाळगली तरी खूप काहि बदलु शकेल. अर्थात प्रत्येकाने हा विचार करायला हवा. स्वत:ला “सुशिक्षित” म्हणवणारे आणि चकाचक ब्रॅंडेड कपडे – बुट घालुन वावरणारे जेव्हा वेफर्स खाऊन त्याचे पाकिट चुरगाळुन रस्त्यात फेकतात, कोल्ड्रिंकचे ग्लास रेल्वेच्या रुळांत फेकतात तेव्हा त्रागा होतो. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांनी आपल्या एका भाषणात एक अचुक उदाहरण दिले होते – “आपण परदेशात गेल्यावर तिथले स्वच्छतेचे नियम पाळतो कारण माहित असतं कि चुकले तर पकडले जाऊ आणि डॉलर्स मध्ये दंड भरावा लागेल. पण ज्या क्षणी आपण भारतात उतरतो लगोलग हातातला कचरा खाली पडतो आणि घरी आल्यावर मात्र बाहेरच्या देशात किती स्वच्छता आहे हे आपण इतरांना सांगतो!” हे कुठेतरी बदलायला हवं.
शहरातच कशाला? गेल्यावर्षी मी कोयना अभयारण्यात व्याघ्रगणनेसाठी गेलो होते तिथेहि गुटख्याची काहि पाकिटे आढळली होती. डोकं फिरणं सहाजिक आहे पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे कि प्लॅस्टिक हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालाय, त्याला आता हद्दपार करणे शक्यहि नाहि. पण आपण त्याचा वापर शक्य तितका कमी करु शकतो. पावसाळा वगळता एरवी ७-८ महिने आपण कापडि आणि कागदि पिशव्या वापरु शकतो. चॉकलेट ची रॅपर्स, चहा – कॉफिचे ग्लास आपण सार्वजनिक कचराकुंड्यातच टाकायचे कष्ट घेतले तर BMC चे काम आपोआप कमी होईल. आपण फक्त महानगरपालिकेला शिव्या देण्यात धन्यता मानणे मुर्खपणाचे आहे. आपण काय करतो? किती कचरा करतो? हे बघुन त्यात चांगला बदल घडवणे गरजेचे आहे. यात नुसता प्लॅस्टिकच नव्हे तर कुठल्याहि प्रकारचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहि हा नियम प्रत्येकाने स्वत:पुरता तरी पाळावा.
तर पुन्हा मुळ मुद्याकडे – प्रत्येक रविवारी सकाळी ९:३० वाजता आम्हि शिवाजीपार्क जीमखान्यापाशी भेटतो. तिथे सर्वानुमते शिवाजीपार्कचा कुठला एरिया स्वच्छ करायचा हे ठरतं आणि ग्रुप तिथे सरकतो. सध्यातरी महिन्यातुन एक रविवार दादर चौपाटी साफ करायचे ठरते आहे. खरंतर दादर चौपाटि साफ करणं हे सध्या आमच्या आवाक्यापलीकडचं काम आहे हे समजतय, पण कुठुनतरी सुरुवात केलीच पाहिजे. मुळात दादर चौपाटिवर लोकं जात नाहित कारण ती अस्वच्छ आहे आणि ती दुर्लक्षीत राहिल्याने अजुन अस्वच्छ होते आहे.
काहि महिने असेच काम करुन दादर चौपाटि व शिवाजीपार्क जर आम्हि साफ करु शकलो तर पुढील निवडणूकित आम्हि “कार्यसम्राट” म्हणून निवडुन येऊ. हा विनोदाचा भाग सोडला तर महापौर निवासाच्या मागचा समुद्रकिनारा कचर्याने भरलेला असतो आणि महापौर निवासाच्या गेट शेजारच्या बसस्टॉपवर “keep Mumbai clean!” चा मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड लागलेला असतो ह्यापेक्षा मोठा विनोद क्वचितच दुसरा असेल.
असो, सध्या तरी आम्हांला गरज आहे कुठलीहि अपेक्षा न ठेवता आम्हांला मदत करणार्या लोकांची. “आम्हि” तुमची वाट बघतोय!
ऑरकुट आणि फेसबुकवर आमच्या ग्रुपच्या कम्युनिटिज आहेत, त्यांना भेट देऊन त्यात सहभागी होऊन तुम्हि आमच्या कामात सहभागी होऊ शकता, इ-मेल करुन आपल्या नविन कल्पना आमच्यापर्यंत पोहचवुन त्या कल्पना राबवायला मदत करु शकता. -
Click here for Orkut community Link
.
Click here for Facebook group link
cngmumbai@gmail.com
- सौरभ वैशंपायन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment